नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – नागपूर येथील गोरेवाडा मैदानात एका 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मंगळवारी (दि. 9) दुपारी 4 वाजता ही घटना उघडकीस आली. मृतदेहाच्या अंगावर शस्त्राच्या जखमा असल्याने हा खून असावा असा संशय व्यक्त केला जात आहे.
भय्यालाल बैस ( वय 64, रा. लोखंडे ले-आऊट, गोधनी) असे मृत्यू झालेल्या नागरिकाचे नाव आहे. मानकापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भय्यालाल हे चौकीदार होते. सोमवारी सकाळी 11 वाजच्या सुमारास ते घरातून बाहेर पडले होते. पण रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत. नातेवाइकांनी शोधाशोध करून ते आढळले नाहीत.
मंगळवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास गोरेवाडा भागात ज्येष्ठ नागरिकाचा मृतदेह आढळला. माहिती मिळताच मानकापूर पोलिसांनी धाव घेतली. मृतदेहाच्या बाजूला असलेल्या पिशवीत पोलिसांनी दस्तऐवजाची तपासणी केली. त्यावेळी भय्यालाल यांची ओळख पटली. मानकापूर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह मेयो हॉस्पिटलकडे रवाना केला. भय्यालाल यांच्या शरीरावर शस्त्राच्या जखमा आहेत. त्यामुळे खूनाचा संशय व्यक्त केला जात आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच त्यांचा मृत्यू कशाने हे झाला हे स्पष्ट होणार आहे. मानकापूर पोलीस तपास करत आहेत.