पिंपरी : भावजय आणि दीर यांच्यात झालेले भांडण मिटविण्यासाठी बोलाविलेल्या भावांनी लोखंडी गजाने व लाकडी दांडक्याने मारहाण करुन खुन केला. याप्रकरणी देहुरोड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. बबन बाळु मेंगडे (वय २८) आणि गणपत बारकू मेंगडे (वय २२, दोघे रा़ सावरदळे, ता़ खेड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
रामदास मेंगळे असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी शाम बाजीराव मेंगळे (वय ३०, रा़ झेंडेमळा, देहुरोड) यांनी देहुरोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार २० ऑगस्टला रात्री साडेसात वाजता घडला होता. याबाबत पोलिसांनी सांगितले की, शाम मेंगळे यांची पत्नी जिजा व त्यांचा भाऊ रामदास यांच्यात सरपण विकण्यावरुन वाद झाला. त्यांच्यात झालेली भांडणे मिटविण्यासाठी तिने आपला भाऊ बबन मेंगडे व चुलत भाऊ गणपत मेंगडे यांना बोलावले होते.
ते दोघेही २० ऑगस्टला सायंकाळी झेंडेमळा येथील किरण झेंडे यांच्या शेत जमिनीतील झोपडीत आले. त्यांच्यात बोलणी सुरु असताना पुन्हा वाद झाला. त्यात या दोघांनी रामदास व त्यांची आई सोनाबाई यांना लोखंडी गज व लाकडी दांडक्याने हातावर, पायावर व शरिरावर जबर मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या दोघांवर उपचार सुरु असताना रामदास यांचा मृत्यु झाला. देहुरोड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे.