मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – सचिन वाझे प्रकरणानंतर नुकतीच बदली करण्यात आलेले माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे शिवसेनेने कौतुक केले आहे. ‘मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंह यांना बदलले म्हणजे ते गुन्हेगार ठरतात असे नाही,’ अशा शब्दांत शिवसेनेकडून परमबीर सिंह यांची पाठराखण करण्यात आली आहे.
अँटिलिया समोर आढळलेल्या स्फोटकांच्या प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना ‘एनआयएकडून अटक करण्यात आली आहे. सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर संपूर्ण पोलीस दलाबरोबरच राज्य सरकारचीसुद्धा बदनामी झाली आहे. या प्रकरणावरून विरोधकांनी सरकारवर हल्लबोल केला होता. त्यानंतर राज्य सरकारकडून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये परमबीर सिंग यांचा सुद्धा समावेश होता. मात्र बदलीनंतरसुद्धा शिवसेना परमबीर सिंह यांच्या पाठीशी उभी असल्याचे समजत आहे. सामनाच्या आजच्या अग्रलेखातून शिवसेनेने परमबीर सिंह यांच्या कामाचे कौतुक केले आहे.
शिवसेनेने काय म्हटले ?
‘परमबीर सिंह यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाची सूत्रे अत्यंत कठीण काळात हाती घेतली. कोरोना संकटाशी लढण्यासाठी त्यांनी पोलिसांत जोश निर्माण केला. धारावीसारख्या भागात ते स्वतः जात राहिले. सुशांत, कंगनासारख्या प्रकरणी त्यांनी पोलिसांचं धैर्य ढळू दिलं नाही. त्यामुळं पुढे या प्रकरणात सीबीआय आली तरी मुंबई पोलिसांच्या तपासापुढं सीबीआयला जाता आले नाही. तसेच टीआरपी घोटाळ्याची फाईलसुद्धा त्यांच्याच काळात उघडली. त्यामुळंच परमबीर सिंह यांच्यावर दिल्लीतील एका विशिष्ट लॉबीचा राग होता,’ असे शिवसेनेने म्हटले आहे.
तसेच शिवसेनेने विरोधी पक्षावरसुद्धा जोरदार टीका केली आहे. ‘पोलिसांसारख्या संस्था राज्याचा कणा असतात. त्याची प्रतिष्ठा सगळ्यांनीच सांभाळायची असते. विरोधी पक्ष महाराष्ट्राशी इमान राखून असेल तर ते पोलिसांची प्रतिष्ठा पणास लावून राजकारण करणार नाहीत. मनसुख प्रकरणामागचे पॉलिटिकल बॉस कोण, हा त्यांचा प्रश्न आहे. याचे उत्तर त्यांनीच शोधावे. पण अशा प्रकरणात कोणीच पॉलिटिकल बॉस नसतो. महाराष्ट्राची ही परंपरा नाही. मनसुखची हत्या झाली असेल तर गुन्हेगार सुटणार नाहीत. त्यानं आत्महत्या केली असेल तर त्यामागच्या कारणांचा शोध घेतला जाईल व त्यासाठीच मुंबईसह राज्यातील पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. तेव्हा विरोधी पक्षाने याची खात्री बाळगावी,’ अशा शब्दांत शिवसेनेने विरोधी पक्षाला सुनावले आहे.