बहुजननामा ऑनलाइन टीम – मुंबई : दोघे जण मोटारसायकलवरुन रात्री त्या ठिकाणी आले. तरुणाने गाडी थांबवली. तरुणी गाडीवरुन उतरली. (shocking incident)त्याने आपल्याकडील पिस्तुल काढून तिच्यावर गोळी झाडली. गोळीचा आवाज ऐकून लोकांचे तिकडे लक्ष गेले. पाठोपाठ त्याने स्वत:वर गोळी झाडून घेतली. या प्रकाराने आजू बाजूचे लोक स्तब्ध झाले. गोरेगावच्या बांगुरनगर परिसरात असलेल्या इन्फिनिटी मॉलच्या मागे हा प्रकार सोमवारी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास घडला.
प्रेम प्रकरणातून हा प्रकार घडल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती आहे. यातील तरुणीचा नुकताच साखरपुडा झाला असल्याचे सांगण्यात येते. हे दोघेही कांदिवली भागात राहणारे होते. तरुणाने या तरुणीला मोटारसायकलवरुन कांदिवलीहून इन्फिनिटी मॉलच्या मागे आणून तिच्यावर गोळीबार केला. त्यानंतर स्वत:वर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले.