भोपाळ : वृत्तसंस्था – राज्यात लसीचा साठा उपलब्ध नसल्याने १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील तरुणांना लसीकरणाचा कार्यक्रम राबविता येणार नसल्याची घोषणा मध्यप्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी केली आहे. गुजरात पाठोपाठ भाजपशासित राज्यांमधील लसीकरण पुढे ढकलणारे मध्य प्रदेश हे दुसरे राज्य आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी १८ ते ४४ वयोगटातील तरुणांचे १ मेऐवजी १५ मेपासून लसीकरण सुरु करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब, छत्तीसगड, झारखंड या विरोधी पक्षाच्या राज्यांनी याआधीच लसीचे डोस उपलब्ध नसल्याने १८ ते ४४ वयोगटातील तरुणांचे लसीकरण सुरु करता येणार नसल्याचे जाहीर केले आहे.
महाराष्ट्रात १८ ते ४४ वयोगटातील तरुणांना मोफत लस देण्याची घोषणा केली असली तरी लसीकरण कधी सुरु होणार हे अनिश्चित आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्राला सर्वाधिक लस पुरवठा केला असून नियोजनाअभावी लसीकरणाचा गोंधळ उडत असल्याचा आरोपी राज्यातील भाजप नेत्यांकडून वारंवार करण्यात येतो़ परंतु, आता विरोधी पक्षांच्या राज्येच नव्हे तर भाजप शासित राज्यांमध्येही लसींचा तुटवडा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी गुरुवारी रात्री वरिष्ठ अधिकार्यांची आढावा बैठक घेतली. त्यानंतर १ मेपासून तरुणांसाठी लसीकरण मोहिम राबविता येणार नसल्याचे जाहीर केले. चौहान यांनी ही घोषणा करताना लोकांना धीर धरायला पाहिजे आणि घाबरु नका, असे आवाहन केले.