हिसार : बहुजननामा ऑनलाइन – येथील २२ वर्षीय सोनी या तरुणीचा प्रेरणादायी असा प्रवास समोर आला आहे. नोकरीस लागण्याच्या ५ दिवसांपूर्वीच सोनीच्या वडिलांनी अचानक त्यांचा निरोप घेतला होता. मात्र, ती न डगमतता कुटूंबाचा आधार बनून उभी राहिली आणि हरियाणा रोडवेजच्या डेपोत नोकरीस लागली. आज सोनी हिसार आगारात यांत्रिकी सहाय्यक म्हणून कार्यरत आहे.
सोनीचे वडील नरसी यांचे आजारपणामुळे २७ जानेवारी २०१९ साली निधन झाले. तिची आई गृहिणी आहे, तर सोनी आठ बहिणींमध्ये तिसऱ्या क्रमांकाची आहे. सोनी हिसार आगारात दररोज बस दुरुस्त करण्याचे काम करत असल्याने, तिच्या उत्पन्नाने कुटूंबाचा उदरनिर्वाह चालतो. त्याचसोबत सोनी मार्शल आर्ट्स पंचॅक सिलेट गेममध्ये एक उत्तम खेळाडू राहिली आहे.
तीन सुवर्णपदके
पंचक सिलेट गेममधील मार्शल आर्टच्या राष्ट्रीय स्पर्धेत सलग तीन वेळा बाजी मारत सुवर्णपदकाची कमाई सोनीने केली होती. या स्पोर्ट्स कोट्या मार्फतच तिला हिसार आगारात यांत्रिकी सहाय्यक म्हणून नोकरी मिळाली. पंचक सिलेट हा मार्शल आर्टचा सर्वात सुरक्षित खेळ असून, यात सहभागींना त्यांच्या प्रतिस्पर्धकाला चेहऱ्यावर मारण्याची परवानगी नसते.
आधी कबड्डी नंतर पंचक सिलेट
सुरुवातीस सोनीने आपल्या गावात कबड्डी खेळण्यास सुरुवात केली होती. मात्र, त्यासाठी पूर्ण टीमची गरज होती. नंतर एक दिवशी तिची मैत्रीण तिला भेटली, तिने पंचक सिलेट गेममध्ये सहभागी होण्यास सांगितले. काही दिवसानंतर सोनीने यात प्रवेश केला आणि पदके आणण्यास सुरुवात केली.
वडिलांनी केले प्रेरित
सोनीच्या वडिलांना मुलगी खेळाडू बनून देशात नाव करेल अशी आशा होती. सोनीने वडिल्यांच्या सांगण्यावरुन सन २०१६ साली खेळण्यास सुरुवात करत तीन सलग सुवर्णपदके जिंकली. त्यानंतर तिला स्पोर्ट्स कोट्याच्या माध्यमातून ग्रुप डीमध्ये हिसार आगारात नोकरी मिळाली.