नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नवी दिल्लीतील औरंगजेब रोड या रस्त्याचे नाव ए.पी.जे. अब्दुल कलाम असे केले आहे. आता औरंगजेबाचा मोठा भाऊ शहजादा दारा शुकोह यांच्या समाधीचा शोध केंद्र सरकार घेत असून दारा शुकोह हा ‘सच्चे हिंदुस्थानी’ म्हणून त्याचा गौरव होत आला आहे. दारा यांची समाधी शोधण्यासाठी केंद्रीय सांस्कृतिक विभागाने भारतीय पुरातत्व विभागाची सदस्य समिती नियुक्त केली असून त्यांच्या समाधीवर भव्य दारा शुकोह स्मारक उभारायची योजना असल्याचे केंद्र सरकारने सांगितले. मुघल सम्राट हुमाँयू यांची समाधी असलेल्या संकुलात मुगल घराण्यातील इतर सदस्यांच्याही कबर असून त्याच संकुलात आणखी एका कबर दारा शुकोह यांची असल्याचे ओळखले जाते.
‘शाहजहाननामा’ हे मुहम्मद सलेह यांनी लिहिलेले असून त्यानुसार सत्तेसाठी जेव्हा संघर्ष झाला तेव्हा विजयी झालेल्या लहान भावाने म्हणजे औरंगजेबाने मोठ्या भावाला म्हणजे दादा शुकोहला साखळदंडाने बांधत दिल्लीला आणले. औरंगजेबाने दाराचे शिर कापत आग्रा किल्ल्यावर पाठवले आणि त्याचा उरलेला देह हुमायूची समाधी असलेल्या भागात पुरला गेला. इथे मुघल वंशातील १४० सदस्यांची कबर असून तिथे दाराची कबर म्हणून जी समाधी ओळखली जाते, ती दाराचीच असल्याचे पुरावे नाहीत. म्हणूनच सात सदस्यांची समिती स्थापन केली असून पुराव्यांसह दाराची कबर शोधून काढण्याचे आव्हान या समितीसमोर आहे. समितीला ३ महिन्यांचा कालावधी दिला असून गरज पडल्यास हा कालावधी वाढवला जाईल.
‘दारा हे त्या काळातील एक मुक्त विचारवंत होते. पण त्यांची समाधी शोधून काढणे हे एक आव्हानच आहे, असे समितीतील सदस्य के.के. मुहम्मद यांनी म्हटले. तर एका सदस्याने हुमाँयू समाधी संकुलातील एक कबर ही दाराचीच असल्याचे सांगितले जाते, असे मणी यांचे म्हणणे आहे. पण तिला कुठलाही आधार नाही. १८५७ पर्यंत मुगल घराण्यातील सगळ्यांचीच कबर हुमायूँ समाधी संकुलात बांधली आहे, असे अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील प्राध्यापक शिरीन मुसवी यांनी म्हटले आहे. तर दाराला हुमायूँ समाधी संकुलातच पुरलेले आहे, यावर सर्वच इतिहास तज्ज्ञांचे एकमत असल्याचे यदुनाथ सरकार यांचे मत आहे.