जळगाव : बहुजननामा ऑनलाइन – जळगावातील मनसे कार्यकर्त्याचा निर्घृण खून केल्याची घटना आज सकाळी जळगाव शहरातील सेंन्ट लॉरेन्स जवळ उघडकीस आली. या घटनेमुळे जळगावमध्ये खळबळ उडाली असून शहरात तणावाचे वातावरण आहे. दरम्यान नातेवाईकांनी आरोपींना जो पर्यंत अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे. यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात तणावाचे वातावरण झाले आहे. हा प्रकार मध्यरात्री घडला असल्याचे सांगण्यात येत आहे.
शाम दिक्षित (रा. देविदास कॉलनी) असे खून करण्यात आलेल्या मनसे पदाधिकाऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी काव्यरत्नावली चौकात आयोजित दहीहंडीच्या कार्यक्रमास उपस्थित राहुन शाम रात्री बाराच्या सुमारास घरी आले होते. घरी आल्यानंतर त्यांना फोन आला. त्यामुळे ते घराबाहेर पडले. रात्रभर ते घरी आले नाहीत. सकाळी त्यांचा मृतदेह घराजवळ असलेल्या कृपाळू साईबाबा मंदिराजवळ आढळून आला.
शाम दिक्षित यांच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आला आहे. दरम्यान आज सकाळी रस्त्याने जाणाऱ्या लोकांनी हा प्रकार पाहिल्यानंतर त्यांच्या घरी याची माहिती देण्यात आली. त्यांच्या आई आणि बहिणीने घटनास्थळी धाव घेत हंबरडा फोडला. या घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली. मनसे कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवून दिला.