बहुजननामा ऑनलाईन – जगभरात कोरोना संसर्गाने थैमान घातलं आहे. देशातही कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. बॉलिवूडमध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे. बच्चन कुटूंबातील चौघांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर अभिनेता रितेश देशमुखाची पत्नी अभिनेत्री जेनेलिया डिसुझा-देशमुखलाही तीन आठवड्यांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. आता ती कोरोनमुक्त झालीय. त्यातच मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे व त्याची पत्नी आणि एका मुलाला कोरोनाची बाधा झाल्याचं त्यानं सांगितलं होत. त्यानंतर आता आणखी काही मराठी कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.
बिग बॉस मराठीच्या सिझन २ मधील स्पर्धक अभिजित केळकर आणि तुला पाहते रे मालिकेतील अभिनेत्री पूर्णिमा डे यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. अलिकडेच झी युवा वाहिनीवरील सिंगिंग स्टार या सेलिब्रिटी रिअॅलिटी कार्यक्रमात अभिजित व पूर्णिमा स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत.
या शोच्या सेटवरच रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली होती. मात्र आता ते दोघे उपचारानंतर बरे झाले आहेत. तसेच सेटवरील दोन क्रू मेंबर्स देखील कोरोना बाधित आहेत असे समजत आहे. म्हणून १० सप्टेंबरपर्यत या शोचे शूटिंग थांबवण्यात आले आहे.
अभिजित तळेकरने आपला कोरोना अहवाल सकारात्मक आल्याचं समाज माध्यमाच्या माध्यमातून सांगितलं आहे. तो म्हणाला, सर्व प्रकारची काळजी घेऊनही मला कोरोनाची लागण झाली. माझी फक्त पाठ दुखत होती या व्यतिरिक्त मला आणखी काहीही नव्हते किंवा सर्दी, खोकला, ताप अशी कुठलीही लक्षणे नव्हती. डॉक्टरांना विचारल्यावर त्यांनी चाचणी करण्यात सांगितलं. तेव्हा अहवाल सकारात्मक आला व त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी व्यवस्थित उपचार घेत आहे. तसेच पत्नी तृप्ती आणि मुले राधा व मल्हार ठणठणीत असल्याचं अभिजीतने म्हटलं आहे.