पुणे : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केदारनाथ दौऱ्यावरुन गेले होते त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निशाणा साधला आहे. देशाचे पंतप्रधान भगवे कपडे घालून सकाळपासून संध्याकाळपर्यंत गुहेत जाऊन बसले होते, हे देशाने पाहिले. जग कुठे चाललंय, आधुनिक विज्ञानात काय सुरु आहे आणि आम्ही गुहेत जाऊन बसतो, नव्या पिढीसमोर तुम्ही कोणता आदर्श ठेवताय, अशा शब्दात शरद पवारांनी मोदींवर टीका केली आहे.
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीत मोठे बदल होण्याचे संकेत शरद पवार यांनी याआधी दिले होते, त्यानिमित्त आज पिंपरी- चिंचवडमध्ये पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी त्यांनी मोदींवरही टीका केली. केदारनाथमध्ये मोदी गुहेत जाऊन ध्यानाला बसले होते. याचा दाखला देत शरद पवारांनी मोदींवर टीका केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यात शरद पवार यांना पाचव्या रांगेतील पास दिल्याने मानापमानाचे नाट्य घडले होते. पण हा फार महत्वाचा प्रश्न नाही. काही गैरसमज झाला असेल तर तो सोडून द्यायचा. हा काही वादाचा प्रश्न नाही. कदाचित माझ्या ऑफिसची कमतरता असावी, असे सांगत शरद पवारांनी या वादावर पडदा टाकला.