नाशिक : बहुजननामा ऑनलाईन : सैन्यदलात नोकरी लावण्याचे अमिष दाखवून एका तरुणाची साडेतीन लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर गुरुवारी (दि. 18) देवळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवळा (जि. नाशिक) येथे ही घटना घडली आहे.
राजू अहिरे व दीपक बागूल (दोघे रा. वाखारी, ता. देवळा) अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी अनिल अहिरे (रा. मेशी) यांनी फिर्याद दिली आहे. देवळा पोलिसांनी दिेलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनिल आहिरे या तरुणाला तसेच त्याच्या मित्रांना सैन्यदलात नोकरी लावून देण्याच्या आमिषाने संशयित आरोपी राजू अहिरे व दीपक बागूल यांनी संगनमताने त्यांच्याकडून साडेतीन लाख रुपये उकळले. या पैशांचा विनियोग स्वतःच्या फायद्यासाठी करून घेत फिर्यादीची फिसवणूक केली. पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक के. वाय. भवर, सहायक उपनिरीक्षक ए. बी. फसाले तपास करीत आहेत.