माजलगाव : बहुजननामा ऑनलाईन – अवैध वाळू उपसा करणारी गाडी चालू देण्यासाठी 65 हजार रुपयांची लाच घेताना माजलगावचे उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड यांना चालक लक्ष्मण तात्यासाहेब काळे याच्यासह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जालना येथील पथकाने गुरुवारी (18) रंगेहाथ पकडले होते. याप्रकरणी शुक्रवारी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
श्रीकांत गायकवाड हे माजलगावला उपविभागीय अधिकारी म्हणून काम करत होते. बीड जिल्ह्यमध्ये दोन दिवसात लाचखोर बीडीओसह एका उपजिल्हाधिकाऱ्याला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याने लाचखोरांचे धाबे दणाणले आहेत.
काय आहे प्रकरण ?
माजलगाव तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा केला जातो. यासाठी अधिकाऱ्यांना हप्ते द्यावे लागतात अशी चर्चा परिसरात होत असते. गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास उपविभागीय अधिकारी श्रीकांत गायकवाड यांनी वाळूची गाडी चालू ठेवण्यासाठी 65 हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली. लाचेची रक्कम गायकवाड याचा गाडीचालक लक्ष्मण काळेकडे तक्रारदाराने देताना माजलगावातील संभाजी चौकात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. शुक्रवारी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायमूर्ती ए.एस. वाघमारे यांनी दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.