पुणे : बहुजननामा ऑनलाइन – मुंबईनंतर पुण्यामध्ये कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक आढळून आले आहेत. मध्यंतरीच्या काळात कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी झाले होते. मात्र, 1 फेब्रुवारी पासून पुण्यासह राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढले आहे. पुण्यात देखील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्या महत्त्वाची बैठक बोलावली आहे. ही बैठक सकाळी नऊ वाजता कौन्सिल हॉल येथे होणार आहे.
कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये निर्बंध लागू करायचे की नाही या संबंधीचा निर्णय उद्याच्या बैठकीत घेतला जाणार आहे. या बैठकीला जिल्हाधिकारी, पुणे महापालिकेचे आयुक्त, पुणे पोलीस आयुक्त, पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह महत्वाचे अधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत.
उद्या होणाऱ्या बैठकीमध्ये अजित पवार पुणे जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा घेणार आहेत. पुण्यामध्ये कोणते कडक निर्बंध लागू करायचे किंवा लॉकडाऊन करायचे यावर अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत. यानंतर अजित पवार निर्णय घेणार आहे. मुंबईनंतर पुण्यात रुग्ण वाढत असल्याने उद्या होणारी बैठक महत्त्वाची आहे. उद्याच्या बैठकीत कोणते निर्णय घेतले जाणार याकडे पुणेकरांचे लक्ष लागून राहिले आहे.