नांदेड : बहुजननामा ऑनलाईन – जिल्ह्यातील कुंभार समाजाची जनगणना करण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. महासंघाचे पदाधिकारी आपल्या घरी येतील त्याना कुटुंबातील सदस्यांची योग्य व सत्य माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष विजयराव देवडे यांनी केले आहे.
जिल्ह्यात कुंभार समाज किती आहे, पारंपरिक व्यवसाय किती कुटुंब करतात, मूर्तीकाम किती करतात, दारिद्रय रेषेखाली किती कुटुंब आहेत, नोकरदार किती, व्यवसाय करणारे, शेती करणारे किती, मजूरी करणारे किती अशी वेगवेगळी यादी तयार करुन शासनाच्या योजना कोणाला देता येतील याचे नियोजन यातून करण्यात येईल. तसेच शासनाने माती कला बोर्ड मंजूर केला आहे. चालू आर्थिक वर्षात दहा कोटी मंजूर झाले आहेत. या योजनेचा फायदा आपल्याला कसा करुन घेता येईल हेही पाहिले जाईल. जिल्ह्यातील कुंभार समाजाचे एकीकरण होणे गरजेचे असल्यामुळे तसेच आपल्या समाजावर सामाजिक, शैक्षणिक, राजकीय अन्याय होऊ नयेत, संघटित होण्यासाठी जनगणना होणे महत्वाचे असल्यामुळे हे समाजकार्य हाती घेतले आहे. जिल्ह्यातील कुंभार समाजाने या जनगणनेच्या कामात सहकार्य करावे, असेही देवडे यांनी म्हटले आहे.