बहुजननामा ऑनलाइन टीम – मध्यरात्री झालेल्या चोरीची तक्रार नोंदवण्यासाठी गेले असता ठाणे अंमलदार चक्क खुर्ची बाजूस सारुन पोलीस ठाण्यातच ऑन ड्युटी झोपी(sleep on duty) गेले. तासाभराच्या प्रयत्नानंतर कच्ची तक्रार नोंदवून तक्रारदारास परत पाठवण्याचा संतापजनक असा प्रकार शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात समोर आला.
मिळालेल्या माहितीनुसार, जवाहरनगर येथील शुभम बाळू कवडे यांची नोटिंग मशीन मंगळवारी (५ जानेवारी) रात्री दीडच्या सुमारास चोरीला गेली. त्यानंतर माहिती मिळताच मध्यरात्रीच शुभम यांनी तात्काळ शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठले. तेथे ऑन ड्युटीवर असलेले अंमलदार झोपी गेल्याने त्यांनी उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो अयशस्वी ठरल्यानंतर शुभमने दुसऱ्या कॉन्स्टेबलला बोलवून त्यांना जागे करण्यात आले. तब्बल तासाभरानंतर कच्ची तक्रार नोंदवल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, एकीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील पोलीस दलात सुधारणा करण्यासोबतच अवैध व्यावसायिकांचा कडक बंदोबस्त करण्याचे काम सुरु आहे. त्यातच अशा घटनांमुळे पोलीस दलास बदनामीला सामोरे जावे लागत आहे.