बहुजननामा ऑनलाइन टीम – पोलिस शिपायाच्या बुटाच्या सॉक्समध्ये दोन चिठ्ठ्या सापडल्याचा धक्कादायक प्रकार कळंबा मध्यवर्ती कारागृहात उघडकीस आला आहे. सापडलेल्या चिठ्ठीत ‘माझे अर्जंट काम आहे, ही चिठ्ठी घेऊन येणाऱ्यांना पंचवीस हजार रुपये द्यावेत’, असा मजकूर लिहिल्याचे आढळले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या चिठ्ठ्यांवर ज्या कैद्यांची नावे आहेत, त्यांनी या चिठ्ठ्या लिहिल्या नसल्याची माहिती तुरुंग अधीक्षक चंद्रमणी इंदुलकर यांनी दिली.
ज्या संबंधित पोलिस शिपायाकडून हा प्रकार घडला आहे, त्याच्या चौकशीचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविला असून खातेअंतर्गत कारवाई केली जाईल, असे इंदुलकर यांनी सांगितले. इंदुलकर म्हणाले की, कारागृहात मोबाइलसह इतर वस्तू येऊ नयेत, यासाठी मुंबईसह राज्यातील सर्वच कारागृहात दक्षता घेतली जात आहे.
काही पोलिसांकडून कैद्यांच्या चिठ्ठ्या नातेवाईकांना पाठविल्या जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. म्हणून शनिवारी सायंकाळी ड्यूटी बदलताना पोलिसांची झडती घेतली. तेंव्हा पोलिस शिपायाच्या उजव्या पायाच्या बुटातील सॉक्समध्ये दोन चिठ्ठ्या आढळल्या. त्याची चौकशी केली असता संबंधित कैद्यांनी या चिठ्ठ्या आमच्या नसल्याचे सांगितले. तसेच चिठ्ठीवरील सही सुद्धा त्यांची नसल्याची माहिती पुढे आली आहे.