कानपुर : वृत्तसंस्था – कानपूरच्या बिकरू प्रकरणात तुरुंगात पाठवण्यात आलेल्या बदमाश शशिकांत पांडेयची पत्नी मनु हिच्याविरूद्ध कट रचण्याचे पुरेसे पुरावे सापडले आहेत. पोलिस आता मनुलाही तुरूंगात पाठवणार आहेत. मनुची सध्या चौकशी सुरु आहे. तसेच नवविवाहित खुशीलाही तुरूंगातून सोडले जाणार नाही. दोघींनाही घटनेची माहिती असल्याचा आरोप आहे. असे असतानाही पोलिसांना माहिती देण्याऐवजी दोघीही आरोपींसोबत या कटात सामील झाल्या. बिकरू घटनेनंतर चकमकीत मारले गेलेले प्रेम प्रकाश पांडेयची सून आणि तुरुंगात पाठवलेल्या शशिकांतची पत्नी मनु पांडेय यांचा ऑडिओ व्हायरल झाला होता. हे ऑडिओ घटनापूर्व तयारीपासून ते पोलिस कर्मचाऱ्यांना मारल्यानंतरचे आहेत.
सुरुवातीला मनु खोटे बोलून घटना लपवत होती. पोलिसांनी काटेकोरपणे चौकशी केली असता तिने संपूर्ण प्रकरण सांगितले. तिने सांगितले की, घराच्या दरवाज्यावर विकास दुबे व अन्य आरोपींनी मिळून दोन ते तीन पोलिसांना गोळ्या घालून ठार केले होते. आपला जीव वाचवण्यासाठी डीएसपी देवेंद्र मिश्रा यांनी त्याच्या घरात उडी घेतली होती. तेव्हा विकास, प्रेम प्रकाश पांडेय, अमर, प्रभात, बउआ हे देखील तिथे पोहोचले आणि डीएसपीची निर्घृण हत्या केली होती. एसएसपी दिनेश कुमार पी म्हणाले की, मनुविरूद्ध पुरावे सापडले आहेत. पुरावा दिला जात आहे. लवकरच तिला तुरूंगात पाठवले जाईल. तिच्या व्हॉईस सॅम्पलसह व्हायरल रेकॉर्डिंग तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले आहेत.
तुरुंगातच राहणार खुशी
चकमकीत मारल्या गेलेल्या अमर दुबेचे २९ जून रोजी लग्न झाले होते. दोन दिवसांनंतरच बिकरू प्रकरण झाले. पोलिसांनी कट रचल्याच्या आरोपाखाली खुशीलाही तुरूंगात पाठवले होते. नंतर पोलिसांनी तिच्याविरूद्ध पुरेसे पुरावे नसल्यामुळे तिची सुटका करण्याची प्रक्रिया सुरू केली होती, पण आता पोलिसांना पुरावा मिळाला आहे. एसएसपीचे म्हणणे आहे की, मनुप्रमाणेच खुशीलाही घटनेची माहिती होती. त्यामुळे तिच्यावरही आरोप ठेवण्यात आले आहेत. तर शुक्रवारी लग्नाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये ती प्रभात मिश्राबरोबर नाचताना दिसत आहे. तिच्या कुटुंबीयांनी सांगितले होते कि तिचे लग्न जबरदस्तीने झाले होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे. व्हिडिओमध्ये तसे वाटत नाही. चौकशीतही ही बाब समोर आली नाही.
मी सर्व सत्य बोलण्यास तयार आहे
पोलिसांनी मनुला हाऊस अरेस्ट केले आहे. पोलिस घरी तैनात आहेत. प्रत्यक्षदर्शी म्हणून मनुशिवाय दुसरा कोणीही साक्षीदार असू शकत नाही. त्यामुळे पोलिसांनी सरकारी साक्ष देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. शुक्रवारी मनुने मोठे पोलिस दल आणि मीडिया कर्मचाऱ्यांना पाहिले तेव्हा ती किंचाळून म्हणाली की ती अगोदर घाबरली होती, म्हणून खोटं बोलली. आता ती पोलिसांना सर्व काही सांगण्यास तयार आहे. तिचे म्हणणे आहे की पोलिसांचा पहारा आहे. ते कुठेही जाऊ देत नाहीत. कोणाशी बोलू देत नाहीत.