बहुजननामा ऑनलाईन – अभिनेत्री कंगना रणौतने 9 सप्टेंबरला मुंबईत येत आहे. त्यापार्श्वभूमीवर करणी सेना तिच्या सुरक्षिततेसाठी मैदानात उतरली आहे. कंगणा मुंबईत येताच विमानतळापासून तिला करणी सेनेकडून सुरक्षा देण्यात येणार आहे. त्यासाठी करणी सेनेचे सदस्य विमानतळावर उपस्थित राहणार आहेत.
मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने शिवसेना खासदार संजय राऊत आणि कंगना यांच्यात ट्विटरवर खडाजंगी पाहायला मिळाली आहे.
वादाच्या पार्श्वभूमीवर सरकाने कंगनाला वाय प्लस दर्जाची सुरक्षा दिली आहे. तर दुसरीकडे एकेकाळी कंगनाचा विरोध करणारी करणी सेना आता तिला पाठिंबा देत आहे. करणी सेनेचा कंगनाला पाठिंबा असून 9 सप्टेंबर रोजी करणी सेनेचे काही सदस्य मुंबई विमानतळावर कंगनाच्या सुरक्षेसाठी उपस्थित राहणार आहेत. मुंबई विमानतळावरून तिच्या घरापर्यंत करणी सेनेचे सदस्य तिला सुरक्षा पुरवणार आहेत. मुंबई दौर्यादरम्यान कंगनाच्या सुरक्षेची जबाबदारी उचलणार असल्याचे करणी सेनेचे जीवन सोलंकी यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, कंगनाच्या ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी करणी सेनेकडून कंगनाला धमक्या देण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता करणी सेनेकडून कंगणाला सुरक्षा देण्यात येत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे .