नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत, अमेरिका आणि तैवाननंतर आता जपानने चीनला जोरदार तडाखा दिला आहे. जपानने औद्योगिक क्षेत्रासंदर्भातील मोठा निर्णय घेतला आहे. चीनमध्ये असणार्या सर्व 57 जपानी कंपन्यांना मायदेशी परत आणण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. विशेष म्हणजे या सर्व गोष्टींमध्ये होणारा संपूर्ण खर्च उचलण्याची तयारी जपान सरकारने दाखवली आहे.
जपानी कंपन्या मायदेशी परत आल्यास त्यांना आवश्यक असणारे सर्व सहकार्य सरकारमार्फत केले जाणार आहे. जपानी कंपन्यांच्या पुरवठा साखळीवर काहीही परिणाम होऊ नये आणि त्या मुख्यपणे चीनवर अवलंबून राहू नयेत म्हणून जपान सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. जपानने चीनमधील सर्व 57 जपानी कंपन्यांना मायदेशात येऊन उत्पादन घेण्यासाठी आर्थिक मदत करण्याच्या दृष्टीने 53.6 कोटी डॉलर्सचा निधी जाहीर केला आहे. चीनबरोबरच आशियामधील व्हिएतनाम, म्यानमार, थायलंड आणि इतर दक्षिण पूर्व आशियाई देशांमधील जपानी कंपन्यांनी पुन्हा आपल्याच देशात येऊन उद्योग करावा यासाठी सरकराने हालचाली सुरु केल्या आहेत. जपानमधील निक्केई या वृत्तपत्रामधील माहितीनुसार सरकार सर्व जपानी कंपन्यांना मायदेशात परत आणण्यासाठी एकूण 70 अरब येन खर्च करणार आहे. व्यापाराबरोबच चीनचे परराष्ट्रसंदर्भातील धोरण सर्वांच्या सहाकर्याने काम करण्याचे नाहीय असे जपानचे म्हणणे आहे.