जळगाव : बहुजननामा ऑनलाईन – टी बीच्या आजाराने एका तरुणाचा मृत्यु झाल्यानंतर त्याच्या अंत्यसंस्काराची सर्व तयारी पूर्ण झाली होती. अग्नी देण्यापूर्वी पत्नीने शेवटचे एकदा त्यांच्या चेहरा पाहू देण्याची विनवणी केली. पण, त्याचा भाऊ घाई करु लागला. मात्र, पत्नीचा टाहो ऐकून शेवटी त्याच्या चेहर्यावरील कापड दूर करण्यात आले. चेहरा पाहण्यासाठी पुढे झालेल्या पत्नीला धक्काच बसला. आपल्या पतीच्या गळ्यावर तिला व्रण दिसला. ते पाहून तिने संशय व्यक्त केला आणि अग्नि देण्यासाठी सरणावर ठेवलेला मृतदेह पोहचला थेट रुग्णालयात. जळगावमध्ये ( Jalgaon) मंगळवारी रात्री आठ वाजता मेहरुण स्मशनाभूमीत हा प्रकार घडला. योगेश वसंत अत्तरदे (वय ४०, रा. एमआयडीसी कॉलनी, मेहरुण) असे मृत्यु पावलेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबतची माहिती अशी, योगेश याला टी बीचा आजार होता. गेल्या ९ महिन्यांपासून ता बेपत्ता होता. दहा दिवसांपूर्वीच तो घरी आला होता. तब्येत खराब असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याच्या तब्येतीत सुधारणा होत नसल्याने चार दिवसांपूर्वी डॉक्टराने त्याला रुग्णालयातून सोडले होते. मंगळवारी दुपारी चार वाजता त्याचा मृत्यु झाला. तेव्हा त्याची पत्नी सपना माहेरी गेली होती. आई व भावाने रात्री आठ वाजता योगेशवर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे योगेशची पत्नी व तिचे नातेवाईक आले.
मेहरुण स्मशानभूमीत पत्नीने चेहरा दाखविण्याची मागणी केली. तेव्हा भावाने विरोध केला. त्यामुळे इतरांना संशय बळावला. पत्नीने चेहरा उघडला असता योगेशच्या गळ्यावर व्रण दिसून आले. त्याला फाशी दिल्याचा संशय व्यक्त करण्यात आल्याने मृतदेह रात्री उशिरा पुन्हा शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. एमआयडीसी पोलीस ठाण्याला ही माहिती कळविण्यात आली. आता शवविच्छेदनानंतर मृत्युचे नेमके कारण स्पष्ट होईल.