मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – प्रसिद्ध अभिनेत्री अमिषा पटेल हिचे इंस्ट्राग्राम अकाऊंट सायबर चोरट्यांनी हॅक केले होते. अत्यंत गुंतागुंतीच्या प्रकरणात महाराष्ट्र सायबर पोलिसांनी (Cyber Police) २४ तासाच्या आत हे अकाऊंट पुन्हा रिस्टोअर्स केले. अभिनेत्री अमिषा पटेल हीने आपले इंस्ट्राग्राम अकाऊंट हॅक केल्याची तक्रार सायबर पोलिसांकडे (Cyber Police) केली होती.
तिने अकाऊंट उघडताच त्यावर इंस्ट्राग्रामच्या कॉपी राईट कायद्याचा भंग केल्याबद्दल तुमचे अकाऊंट २४ तासासाठी सस्पेंड करण्यात आल्याचा मेसेज दिसत होता. तिला फेक इंस्ट्राग्राम पेज दिसत होते व त्या पेजवर बदल केल्याचे आढळून येत होते. महाराष्ट्र सायबर पोलिसांनी याचा तपास सुरु केला. तिच्या अकाऊंट वर जो मेसेज आला होता, त्यासाठी नेदरलँड येथील युआरएलचा वापर केला. तर त्यासाठी जो कॉम्प्युटर (आयपी) वापरण्यात आला होता, तो तुर्कीमधील असल्याचे दाखविले जात होते. अतिशय जटिल आणि अत्याधुनिक पद्धत हॅकर्सकडून वापरण्यात आली होती.
सायबर पोलिसांनी याची तक्रार इंस्ट्राग्रामच्या नोडल अधिकार्यांकडे केली. त्यानंतर इंस्ट्राग्रामने तातडीने दखल घेऊन अमिषा पटेल हिचे अकाऊंट पुर्ववत करुन दिले. याच प्रकारे अभिनेता शरद केळकर याच्याही अकाऊंटवर सायबर हल्ला झाला होता. पोलिसांनी ते खाते पूर्ववत करुन दिले. ही कामगिरी विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव, उपमहानिरीक्षक हरीश बैजल, पोलीस उपअधीक्षक विजय खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील, हेडकाँस्टेबल संतोष बोडके आणि सायबर पोलीस ठाण्यातील कर्मचारी पार पाडली. या टीमला १० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.