भंडारा : बहुजननामा ऑनलाईन – भंडारा जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातात 2 तरूण जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर आता परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, भंडाराकडून 2 तरूण दुचाकीवरून तुमसरला जात होते. यावेळी विरूद्ध दिशेनं येणाऱ्या इंडिका कारनं जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोन्ही तरूणांचा जागीच मृत्यू झाला. खरबी गावाजवळ ही घटना घडली आहे. रोशन बोरकर (वय 22 वर्षे) आणि दुर्गेश कांबळे (वय 20 वर्षे) अशी मृत युवकांची नावं आहेत. दोन्ही युवक मोरगावचे रहिवाशी होते.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा केला. पोलिसांनी चारचाकीसह चालकाला ताब्यात घेतलं आहे. रोशन आणि दुर्गेश या दोन्ही युवकांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी जवळच्या स्थानिक रुग्णालयात पाठवले आहेत. तर या अपघाताचा पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
रोज सुरू असलेल्या पावसामुळं महामार्ग निसरडे झाले आहेत. त्यामुळं गाडी हळू चालवण्याची गरज आहे. याबाबत वारंवार सूचना दिल्यानंतरही अनेकांना वेगावर नियंत्रण ठेवता येत नाही. परिणामी अशा प्रकारे अपघाताच्या घटना समोर येत आहेत. म्हणून प्रशासनाकडूनही सूचना देण्यात आल्या आहेत की, वाहनं हळू चालवा आणि वेगावर नियंत्रण ठेवा