नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताने रशिया आणि पोलंडला मागे टाकत अर्मेनियासोबत एक मोठा संरक्षण करार करत यश मिळवले आहे. या कराराद्वारे भारत संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेद्वारे विकसित आणि भारतइलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडद्वारे निर्मित ४ कोटी डॉलरचे हत्यार अर्मेनियाला विकणार आहे.
मेक इन इंडियाचे यश
माहितीनुसार ‘स्वाती वेपन लोकेटिंग रडार’ प्रणालीचा या डीलमध्ये समावेश असून ही शस्त्रे ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत तयार केली गेली आहेत. यासाठी रशिया आणि पोलंडनेही अर्मेनियाला ऑफर दिली होती. दोन्ही देशांनी या चाचणीचे आयोजनही केले होते. पण अर्मेनियाने भारताने बनवलेल्या प्रणालीवर विश्वास ठेवला आणि हा करार अंतिम झाला आहे.
ही शस्त्रे पुरवली जातील
करारानुसार भारत स्वाती वेपन लोकेटिंग रडार पुरवले जाणार असून ते ५० किमीच्या रेंजमध्ये शत्रूच्या मोर्टार, शेल आणि रॉकेट तेज या हत्यारांचे स्वचालित आणि अचूकपणे माहिती सांगू शकतो.
जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर भारतीय सैन्य ही रडार वापरत असून २०१८ मध्ये लष्कराला ही यंत्रणा चाचणीसाठी देण्यात आली होती. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या शस्त्रास्त्रांच्या निर्यातीमुळे भारताला त्याच्या स्वदेशी प्रणालीच्या विक्रीसाठी नवीन बाजारपेठ खुली होईल, जी युरोपियन व अन्य प्रतिस्पर्ध्यांपेक्षा स्वस्त आहे.
संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, आता संरक्षण निर्यातीला चालना देण्यासाठी दक्षिण-पूर्व आशिया, दक्षिण अमेरिका आणि मध्य-पूर्व देशांवर लक्ष आहे. मोदी सरकारतर्फे २०१४-२५ पर्यंत वर्षाला ३५ हजार कोटी रु. संरक्षण निर्यातीचे लक्ष्य ठेवले गेले आहे.