मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – भांडूप येथील ड्रिम मॉलमधील तिसर्या मजल्यावरील सनराइझ कोविड रुग्णालयाला रात्री उशिरा भीषण आग लागली. या आगीत २ रुग्णांचा होरपळून मृत्यु झाला आहे. या रुग्णालयात ७६ कोविड रुग्णांवर उपचार करण्यात येत होते.
एका मॉलवरील तिसर्या मजल्यावर हे सनराइझ रुग्णालय आहे. या रुग्णालयात ७३ कोविड आणि ३ इतर रुग्णांवर उपचार करण्यात येत होते. रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्कीटमुळे रुग्णालयात आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशामन दलाच्या गाड्या आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. संपूर्ण काचेच्या या इमारतीमुळे आत धूर कोंडून राहिला होता. आग लागल्याचे समजताच रुग्ण इमारतीच्या वरती गेले. तेथून अग्निशामन दलाच्या जवानांनी ७३ जणांची सुटका केली असून त्यांना तातडीने दुसर्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत़ आतमध्ये अजूनही ६ जण अडकून पडल्याचे सांगितले जात आहे़ अग्निशमन दलाकडून २५ गाड्यांमार्फत आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरु होते. सहा -सात तासानंतरही आग धुमसत असून तिच्यावर आता नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. अजूनही आग विझविण्याचे काम सुरु आहे.