पैठण: बहुजननामा ऑनलाईन – गेल्या काही दिवसापासून अंधश्रद्धेमुळे हत्या, आत्महत्येचे प्रकार वाढले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा होऊनही हे प्रकार थाबण्याचे नाव घेत नाही. अशी एक घटना औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे घडली आहे. अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या २५ वर्षीय नंदू घुंगासे या युवकाने महादेव प्रसन्न होईल या वेड्या धारणेने स्वतः चा गळा चिरून महादेवाच्या पिंडीला रक्ताने अभिषेक घालत जीवन संपविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, अंधश्रद्धेची पाळेमुळे किती खोलवर रूजलेली आहेत हे या अघोरी कृत्यातून पुन्हा एकदा अधोरेखीत केली आहे.
कहारवाडा येथील नंदू घुंगासे याची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यातच वडीलांचे काही वर्षापूर्वी निधन झाल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर आली. नंदुचा मोठा भाऊ बेफिकिर वृत्तीने वागत असल्याने नंदुवरच सर्व भार पडला. भावानेही कामधंदा करावा, असे त्याला वाटत होते. मोठ्या भावाला पुणे जिल्ह्यातील एका ठिकाणच्या महादेवाच्या दर्शनास नेल्यास भाऊ चांगला होईल, असे कोणीतरी सुचविले. त्याप्रमाणे त्याला दर्शनाला नेऊन आणले. त्यानंतर भावाच्या वागणुकीत फरक पडल्याचे जाणवले, महादेव आपल्या जीवनात काहीही करू शकतात ही अंधश्रद्धा नंदुच्या मनात दृढ झाली. त्यातूनच त्याने पैठण शहरातील गंगेश्वर महादेव मंदिरात स्वतःचा गळा चिरून आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.