नागपूर : बहुजननामा ऑनलाइन – अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ वेळेत देण्याच्या सूचना अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष रामशंकर कथेरिया यांनी केली.
विभागीय आयुक्तकार्यालयाच्या सभागृहात कथेरिया यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया तसेच गडचिरोली जिल्ह्याची आढावा बैठक पार पडली.
यावेळी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या सदस्य डॉ. स्वराज विद्वान, डॉ. ओमप्रकाश बेडेकर, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, नागपूरचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, गडचिरोलीचे शेखर सिंग, चंद्रपूरचे कुणाल खेमणार, वर्धेचे शैलेश नवाल, गोंदियाच्या कादंबरी बलकवडे, मनपा आयुक्त अभिजीत बांगर, प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण सिद्धार्थ गायकवाड, उपायुक्त संजय धिवरे, पोलीस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार, शिक्षणाधिकारी शिवलिंग पटवे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी भागवत तांबे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व तथा मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती आणि शिक्षणशुल्क, परीक्षा शुल्काचा यावेळी आढावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी करावयाच्या ऑनलाइन प्रक्रियेचा निपटारा लवकरात लवकर करावा तसेच पंतप्रधान आवास योजना व रमाई घरकुल योजनेबाबत अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांचे उद्दिष्ट लवकरच पूर्ण करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. अनुसूचित जातीच्या सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालून सोडवावे, असेही कथेरिया यांनी सांगितले.