नागपूर : बहुजननामा ऑनलाइन – युवकाला विनाकारण मारहाण करून गंभीर जखमी करणाऱ्या आरोपींवर ३२६ कलमासह ॲट्रॉसिटी दाखल करा, अशा मागणीचे निवेदन भारिपचे प्रदेश महासचिव सागर डबरासे आणि शहराध्यक्ष रवी शेंडे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
वाकी येथील वॉटर पार्कमध्ये ३० डिसेंबरला नागपुरातील पंचशीलनगरातील रहिवासी अंकुश वासनिक आणि त्यांचे १६ मित्र सहलीला गेले होते. क्षुल्लक कारणावरून वॉटर पार्कचे मालक आणि त्यांच्या मुलीचा मॅनेजर आणि पार्कच्या गार्डशी वाद झाला. ३० ते ३५ गार्ड्सने अंकुश वासनिकला पार्कच्या रिमांड रूममध्ये नेऊन बेशुद्ध होईस्तोवर मारहाण केली. त्यानंतर पार्कच्या बाहेर फेकून दिले. मित्रांनी बेशुद्धावस्थेत त्याला ऑटोमधून मेयो रुग्णालयात नेले. माहिती कळताच कुटुंबीय रात्री एक वाजता खापा पोलीस स्टेशनमध्ये गेले.
जखमीचे फोटो तसेच मेडिकल रिपोर्टच्या आधारे खापा पोलिसांनी भादंविच्या कलम ३२४, ५०४, ५०६ (३४) अन्वये आरोपींविरोधात गुन्हे दाखल केले. मात्र, गंभीर जखमी असतानाही आरोपींना ३२६ कलमातून वगळण्यात आले.
या कलमासह आरोपींवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पक्षाचे सल्लागार आनंद चौरे, जिल्हा प्रवक्ते सुमेध गोंडाणे, उपाध्यक्ष मिलिंद मेश्राम, युवा सचिव नरेंद्र तिरपुडे, दक्षिण नागपूर विधानसभा क्षेत्राचे सचिव कमलेश शंभरकर, रमेश वासनिक, वैशाली शेंडे, छाया गजभिये, आरती सोमकुंवर, संगीता वासनिक यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व कुटुंबासोबत पक्षाचे हजारो कार्यकर्ते तसेच पीडिताचे कुटुंबीयांनी केली.