जालना : बहुजननामा ऑनलाईन – जालना तालुक्यातील गोंदेगाव शिवारात तलावाच्या काठाला बसलेल्या प्रेमी युगुलाला काही टवाळखोरांनी मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही बाब एवढ्यावरच थांबली नाही तर या टवाळखोरांकडून मुलीचा विनयभंग केल्याची बाब देखील समोर आली आहे. टवाळखोरांनी मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. त्यामुळे हे प्रकरण उजेडात आले असून याबाबत संताप व्यक्त केला जात आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, जालना तालुक्यातील गोंदेगाव शिवारातील एका तळ्याजवळ बसलेल्या प्रेमी युगुलास तीन- चार दिवसांपूर्वी काहींनी मारहाण केली होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. काहींनी हा व्हिडिओ पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांना दिला.
या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षकानी कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिराडकर यांनी पथकासह घटनास्थळाला भेट देऊन मारहाण करणाऱ्यांची धरपकड सुरू केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत असून लवकरच या प्रकरणातील सर्व टवाळखोरांना ताब्यात घेऊन कारवाई केली जाईल अशी आशा येथील नागरीकांतून व्यक्त केली जात आहे.