नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी केंद्रीय मंत्री, राजस्थानचे खासदार बुटासिंग (MP Butasingh) यांचे आज निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. केंद्रीय कृषीमंत्री, ग्रामविकास मंत्री, संसदीय कार्यमंत्री, क्रीडामंत्री, आशियाई गेम्सचे विशेष आयोजन समितीचे अध्यक्ष, बिहारचे राज्यपाल, राष्ट्रीय अनुसुचित जाती आयोगाचे अध्यक्ष अशी विविध पदे त्यांनी भुषविली होती.
बुटासिंग यांचा जन्म २१ मार्च १९३४ रोजी झाला. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी पत्रकार म्हणून काम केले. अकाली दलाचे सदस्य म्हणून त्यांनी पहिली निवडणुक लढविली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. बुटासिंग हे प्रथम १९६२ मध्ये साधना मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेले होते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांचे निकटवर्ती म्हणून ते ओळखले जात. ते लोकसभेवर ८ वेळा निवडून गेले होते. अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस म्हणन त्यांनी काम पाहिले.
Former Union Minister, former MP from Rajasthan and Congress leader Buta Singh passes away.
— ANI (@ANI) January 2, 2021
केंद्रीय गृहमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले. रेल्वे, वाणिज्य, जहाजबांधणी व परिवहन मंत्री, नागरी पुरवठा, ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण, लोकलेखा समिती अध्यक्ष, बिहारचे राज्यपाल म्हणून त्यांनी काम पाहिले होते. बिहारचे राज्यपाल असताना राज्य सरकार बरखास्त करण्याचा निर्णय वादग्रस्त ठरला होता.
सर्वोच्च न्यायालयाने त्यावर ताशेरे ओढले होते. ब्ल्यु स्टार कारवाईशी ते जवळून संबंधित होते. त्यानंतर सुवर्ण मंदिराच्या दुरुस्तीसाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. १९८२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या आयोजनात त्यांचा मोठा सहभाग होता़.