नांदेड : बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यात लागलेली गळती सुरुच आहे. नांदेडमध्येही गळतीला सुरुवात झाली आहे. शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय असलेले बापूसाहेब गोरठेकर राष्ट्रवादी पार्टी सोडून भाजप प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नांदेड जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.
बापूसाहेब देशमुख गोरठेकर हे नांदेड जिल्ह्यातील ज्येष्ठ आणि तितकेच ताकदवान नेते आहेत. जुन्या पिढीतील शब्द पाळण्याचा त्यांचा गुण आजही कायम आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांची संख्या विलक्षण मोठी आहे. राष्ट्रवादी सोडल्यानंतर त्यांच्यासोबत कोणत्याही पक्षात जाण्यास त्यांचे समर्थक तयार आहेत. त्यामुळे नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं भगदाड पडणार आहे. माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांनी समर्थकांचा छोटासा मेळावा घेतला. त्यात काही समर्थकांनी भाजपात जाण्यासाठी गोरठेकर यांना आग्रह केला. गोरठेकर यांनी विधानसभा निवडणूक भोकर विधानसभा मधून लढवावी असाही कार्यकर्त्यांनी आग्रह केला.
विशेष म्हणजे भोकर हा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा मतदारसंघ म्हणून महाराष्ट्र भरात ओळखला जातो. याच भोकरमध्ये गोरठेकर यांनी निवडणूक लढाव असे कार्यकर्ते बैठकीमध्ये म्हणाले. त्यांच्या भाजप प्रवेश करण्यामुळे नांदेड जिल्ह्यात राजकीय उलथापालथ होणार आहे. गोरठेकर यांच्यासोबत अनेक प्रमुख नेते कार्यकर्ते देखील राष्ट्रवादी सोडणार आहेत. त्यामुळे नांदेडमध्ये राष्ट्रवादीचं अस्तित्व संपूर्ण संपणार आहे धोक्यात आलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ईश्वरासमान आहेत, असं वक्तव्य बापूसाहेब यांनी पत्रकारांशी बोलताना केलंय. मात्र जिल्ह्यातील पक्षातील काही बिनकामांच्या नेत्यांमुळे आपण पक्ष सोडत आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पत्नी आमदार अमिता चव्हाण यांनी बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांच्यामुळे लोकसभेला अशोक चव्हाण यांचा पराभव झाल्याचा आरोप केला होता. याबाबत पत्रकारांनी माजी आमदार तथा राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष गोरठेकरांना विचारणा केली असता, आघाडी असताना मला याच लोकांनी दोनदा पाडलं, पण मी कुणावर आरोप केले नसल्याचा दावा त्यांनी केला. चिखलीकर यांच्या चांगले मित्र असल्याने त्यांच्या खासदार होण्यावर शुभेच्छा बॅनर नांदेड शहरात लागले होते. त्यावर गोरठेकर यांचा फोटो दिसताच अनेक जण त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बापूसाहेब गोरठेकर पक्ष सोडणार का ? अशी चर्चा करत होते.
लोकसभा निवडणुकीच्या निकालापासून बापूसाहेब देशमुख हे भाजपच्या व्यासपीठावर अनेकदा दिसून आले. खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याशी त्यांचे सख्य लपून राहिलेले नाही. मात्र राष्ट्रवादी सोडण्याबाबत त्यांनी प्रथमच जाहीरपणे भाष्य केलं. तूर्तास गोरठेकर यांनी कोणत्या पक्षात जाणार हे स्पष्ट केलं नसलं तरी ते भाजपात जातील, उघड फोटो बॅनर वर टाकले आहेत.