पुणे बहुजननामा ऑनलाईन – भाजप आणि शिवसेनेत सध्या जोरदार इन्कमिंग सुरु आहे. मुंबईत सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यानंतर राष्ट्रवादीतील शरद पवार यांच्या खंद्या समर्थकांनी भाजप प्रवेश निश्चित केला आहे. यावरून पुण्यात पोस्टर लावून जोरदार टोलेबाजी सुरु आहे. पुण्यात भाजपा प्रवेश देणे आहे. आणि त्यासमोर नियम व अटी अशा आशयाचे पोस्टर सध्या झळकत आहेत.
पुण्यातील अनेक ठिकाणी भाजपाची खिल्ली उडविणारे हे पोस्टर अज्ञात व्यक्तीकडून लावण्यात आले आहेत. त्यासोबतच भाजपमध्ये प्रवेश देण्यासाठी वेगवेगळे नियम व अटी देण्यात आले आहेत.
काय आहे पोस्टरवर ?
भाजपा प्रवेश देणे आहे.
नियम व अटी
ईडी व इन्कम टॅक्सची नोटीस आलेल्यांना प्राधान्य
भ्रष्टाचाराचा अनुभव असल्यास पहिली पसंती
सहकार क्षेत्र बुडविल्याचा अनुभव हवा
तर यासोबतच टीपही देण्यात आली आहे.
विचारधारेची कोणतीही अट नाही.
आमच्याकडील जागा फुल झाल्यास मित्र शाखेत अडजस्ट करण्यात येईल. अशी तळ टीप देण्यात आली आहे. राज्यात सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस पक्षांना गळती लागली आहे. भाजप आणि शिवसेनेत अनेक नेत्यांनी प्रवेश केला आहे.
अनेकजण पक्षांमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. यावर शरद पवारांकडूनही मोठे आरोप करण्यात आले आहेत. भाजप आणि शिवसेनेने सत्तेचा गैरवापर सुरु केला असून अनेकांना चौकशीची भीती दाखवून फोडण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून सुरु असल्याचे शरद पवार म्हणाले होते. सत्तेचा एवढा गैरवापर मी पाहिला नाही असेही ते म्हणाले होते. त्यानंतर पुण्यात या पोस्टरद्वारे चांगलीच खिल्ली उडविण्यात आली आहे.