बहुजननामा ऑनलाईन टीम : नशीब आजमावण्यासाठी काही लोकं लॉटरीची तिकिटं काढतात. यातून काहींना लॉटरी लागते तर काहींच्या पदरी निराशा पडते. पण, कोणाच्या आयुष्यात कशी लॉटरी लागेल हे काही सांगता येत नाही. होय ना…? अशीच एक घटना मध्य प्रदेशच्या पन्ना येथे घडली आहे. मात्र, येथे एका गरीब शेतकर्याला वेगळी लॉटरी लागली आहे, असेच म्हणावं लागेल. 200 रुपये भाड्यावर घेतलेल्या जमिनीमध्ये या शेतकर्याला सुमारे 60 लाखांचा हिरा सापडला आहे. लखन यादव असे या हिरा सापडलेल्या शेतकर्याचं नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लखन यादव या शेतकर्याने पन्ना येथे 200 रुपये भाड्यावर 10 बाय 10 जमिनीचा एक छोटा तुकडा घेतला होता. तिथे खोदकाम करताना त्याला 14.98 कॅरेटचा हिरा सापडला आहे. खाणीमध्ये सापडलेला हिरा लिलावामध्ये 60.6 लाख रुपयांना विकला आहे. हिर्यामुळे माझं आयुष्य बदलून गेलं आहे. हिरा सापडला तो, क्षण मी कधीच विसरू शकत नाही, असे लखन यादव याने म्हटलंय.
पन्ना जिल्हा आहे हिर्यांसाठी प्रसिद्ध
मध्य प्रदेश राज्यामधील पन्ना जिल्हा हिर्यांसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी अगोदर अनेक शेतकरी आणि मजुरांना मौल्यवान हिरे सापडले आहेत.
लखन यादवने मिळालेल्या पैशातून आपल्या चार मुलांना चांगले शिक्षण देण्याचा विचार केला आहे. माझे शिक्षण झाले नाही. मुलांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे, त्यासाठी मी हे पैसे फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवणार आहे, असेही त्याने सांगितले आहे. याबाबतचे वृत्त एका हिंदी वेबसाईटने दिले आहे.
’त्या’ हिर्यांचा होणार लिलाव…
हिर्याच्या खाणीमधील दोन मजुरांना काही दिवसांपूर्वी मौल्यवान हिरे सापडले होते. दिलीप मिस्त्री यांना कृष्णा कल्याणपूर भागातील जुरापूर खाणीतून 7.44 कॅरेटचा हिरा मिळाला होता, तर लखन यादव यांना 14.98 कॅरेटचा एक हिरा मिळाला होता.
पन्ना जिल्ह्यातील हिरा निरीक्षक अनुपम सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही मजुरांनी कार्यालयामध्ये दोन हिरे जमा केलेत. हिर्याची योग्य किंमत अधिकार्यांकडून ठरविली जाईल. अंदाजानुसार 7.44 कॅरेटचा हिरा सुमारे 30 लाख रुपये असू शकतो, तर 14.98 कॅरेटचा हिरा त्यापेक्षा दुप्पट असू शकतो. या दोन्ही हिर्यांचा लिलाव होणार आहे, असे या अधिकार्यांनी सांगितले होते.