बहुजननामा ऑनलाइन टीम – प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना 35 कोटींच्या खंडणीची धमकी देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अबू सालेमच्या टोळीतील एकाकडून ही धमकी आल्याचं कळतं. खबरदारीचा उपाय म्हणून महेश मांजरेकर यांनी दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. महेश मांजरेकर यांच्या मोबाईलवर खंडणीसाठी रविवारी मेसेज पाठवण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दादर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, खंडणीसाठी धमकी दिल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी एकाला अटक केली आहे. रत्नागिरीतील खेड येथून 32 वर्षाच्या युवकाला पोलिसांनी काल ताब्यात घेतलं असल्याची माहिती आहे.
महेश मांजरेकर हे नाव हिंदी-मराठी इंडस्ट्रीला नवं नाही. अस्तित्व, वास्तव, दबंग, वॉंटेड, काकस्पर्श इत्यादी अनेक सिनेमांतून त्यांनी आपल्या दिग्दर्शनाचा, अभिनयाचा ठसा उमटवलेला आहे. मांजरेकर यांना मेसेज करुन 35 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली. मांजरेकर यांनी तातडीने दादर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने तपास चक्र फिरवून एकाला अटक केली आहे.
खंडणी मागणाऱ्याला रत्नागिरी जिल्ह्यातील खेड मधून ताब्यात घेतले असल्याचे सुत्रांनी सांगितले आहेत. तसेच त्याचा अबू सालेमशी खरंच संबंध आहे का, त्याने कोणत्या उद्देशाने मांजरेकर यांना धमकी दिली होती, या सर्व बाबी पोलीस लवकरच शोधून काढतील, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.