बहुजननामा ऑनलाइन टीम – तेलंगाणा राज्याची राजधानी हैदराबादमध्ये धक्कादायक प्रकार घडलाय. सुमारे 143 लोकांनी अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप एका महिलेने केलाय. याबाबत या 25 वर्षीय पीडितेने पोलिसांना सांगितले आहे, त्यानुसार तिच्या आयुष्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये 143 लोकांनी अनेकदा बलात्कार, अतिप्रसंग केलेत. या प्रकरणी पोलिसांनी 42 पानांचा एफआयआर नोंदविलाय.
हैदराबादच्या पुंजागुट्टा पोलिसांनी 42 पानांचा एफआयआर नोंदविला असून या पानांमध्ये या 143 लोकांची माहिती दिली आहे. या लोकांविरोधात पीडितेने बलात्कार केल्याचा आरोप केलाय. आता पोलीस या सर्व आरोपींची चौकशी करणार असून यामध्ये काही महिलाही सहभागी आहेत, असे समोर आले आहे. पीडितेला वैद्यकीय चाचणीसाठी पाठविले आहे.
पीडितेने ज्या लोकांवर आरोप केलेत त्यामध्ये तिच्या ओळखीचे, राजकारणी, विद्यार्थी नेता, पत्रकार, फिल्म आणि अन्य क्षेत्रातील व्यक्ती यांचा समावेश आहे. लग्नानंतर या महिलेवर पतीने आणि तिच्या सासरच्यांनी लैंगिक अत्याचार करून मारहाण देखील केली आहे. यानंतर तिने तलाक घेतलाय. तलाक घेतल्यानंतर तिने पुढील शिक्षणासाठी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. मात्र, तिथेही तिच्यावर बलात्कार केला आहे, असाही तिने आरोप केला आहे.
मागील काही वर्षांपासून ती पीडिता लैंगिक अत्याचाराचा शिकार बनलीय. मात्र, पहिल्यांदाच पोलिसांत तक्रार दाखल केलीय. महिलेने काही आरोपींवर ठार मारण्याची धमकी देणे आणि ऑनलाईन सेक्स रॅकेट चालविण्याचाही आरोप केलाय.
अशा घटनांवरून देशात महिला सुरक्षित आहेत का? असा प्रश्न पडणे स्वभाविक आहे. बलात्कार, अत्याचार अशा घटनांमुळेच महिलांची सुरक्षितता धोक्यात येत आहे. त्यामुळे वाढते आत्याचार आणि बलात्कार सारखे गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांना आणखी कठोर कायदा सुव्यवस्था राबविण्याची आवश्यकता आहे.