नोएडा बहुजननामा : नुकताच लागू करण्यात आलेल्या नव्या मोटार वाहन कायद्याअंतर्गत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास मोठ्या प्रमाणात आकारण्यात येणाऱ्या दंडाचा धसका वाहनचालकांनी घेतला आहे. अशीच एक घटना नोएडातील इंदिरापुरमधून समोर आली आहे. वाहतूक पोलिसानी चलान फाडण्याच्या दिलेल्या धमकीमुळे एका इंजिनीअर तरुणाचा हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू झाला आहे.
मूलचंद शर्मा हे मुलगा गौरवसोबत रविवारी संध्याकाळी इंदिरापुरमकडे जात होते. गौरव हा कार चालवत होता. एनएच ९ वर इंदिरापुरमजवळ संध्याकाळी सहा वाजता वाहतूक पोलीस तपासासाठी उभे होते. पोलिसांनी गौरवला कार थांबवायला सांगितली, त्याचबरोबर कारवर दांडके मारण्यास सुरुवात केली. गौरवनं पोलिसांच्या या गैरप्रकारावर नाराजी व्यक्त केली. या गोष्टीवर वाहतूक पोलिसांनी दंड आकारण्याची आणि कार ताब्यात घेण्याची धमकी देत गाडीचे फोटो काढण्यास सुरुवात केली. या भीतीनेच गौरव चक्कर येऊन जागीच बेशुद्ध पडला.
गौरव याचे वडील मूलचंद शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी गौरवला जवळच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल केले. गौरवची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी अन्य रुग्णालयात घेऊन जावे, असा सल्ला तेथील डॉक्टरांनी दिला. त्यानंतर गौरवला कैलाश रुग्णालयात नेले असता तेथे तपासणीनंतर गौरवला मृत घोषित केले. दरम्यान, पोलीस उपअधीक्षक वैभव कृष्ण यांनी प्रकाराबद्दल सांगितले कि, कुटुंबीयांनी तक्रार नोंदविल्यास गुन्हा दाखल करून निष्पक्ष चौकशी केली जाईल तसेच दोषींवर कठोर कारवाई देखील करण्यात येईल.