बहुजननामा ऑनलाईन – आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँकेला युनियन बँक ऑफ इंडियाच्या संचालक मंडळाने स्वतः मध्ये विलीनीकरण करण्यास मान्यता दिली आहे. त्याचबरोबर चालू आर्थिक वर्षात बँकेच्या बोर्डाने १७,२०० कोटी रुपये देण्यासही मंजुरी दिली आहे. सोमवारी संचालक मंडळात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
बैठकीत घेतलेले निर्णय
आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँकेला युनियन बँक ऑफ इंडियाच्या संचालक मंडळाने स्वतः मध्ये विलीनीकरण करण्यास मान्यता दिली आहे. एवढेच नाही तर युनियन बँक बोर्डाच्या संचालक मंडळाने २०१९-२० मध्ये बँकेत १७,२०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या सुधारित योजनेस मान्यता दिली आहे. तसेच यामधील १३,००० कोटी रुपये इक्विटी कॅपिटलद्वारे आणि ४,२०० कोटी रुपये टियर एक – टियर दोन बॉडद्वारे दिले जातील असे बँकेने म्हटले आहे.
भांडवल वाढवण्यासाठी इक्विटी शेअर्सद्वारे प्रयत्न
बँकेच्या म्हणण्यानुसार , सरकारच्या मंडळाने प्राधान्य वाटपाच्या माध्यमातून इक्विटी शेअर्स देऊन १३,००० कोटी रुपयांचे भांडवल उभारण्यास मान्यता दिली आहे. यासाठी लागणाऱ्या अन्य नियमकांच्या मान्यताही मिळवल्या जाणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ३० ऑगस्ट रोजी सार्वजनिक क्षेत्रातील १० बँकांच्या चार बँकांत एकत्रीकरणाची घोषणा केली होती.
५ सप्टेंबर रोजी याआधी देखील पंजाब नॅशनल बॅंकचे संचालक मंडळाने ओरिएण्टल बँक ऑफ कॉमर्स आणि युनाइटेड बँक ऑफ इंडियाचे विलीनीकरण करण्यास मंजुरी दिली होती. तसेच अलीकडे अर्थमंत्री सीतारमण यांनी ओरिएण्टल बँक ऑफ कॉमर्स आणि युनाइटेड बँकेचे पंजाब नॅशनल बँकेमध्ये, सिंडिकेट बँकेचे कॅनरा बँकेमध्ये, इंडियन बँकेमध्ये अलाहाबाद बँकेचे तर आंध्र बँकेचे आणि कॉर्पोरेशन बँकेचे युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विलीनीकरण करण्याची घोषणा केली आहे.