नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमलबजावणी संचालनालयाने (ईडी) रॉबर्ट वाड्रा यांच्याविरोधात मनी लौन्ड्रींग आणि शस्त्र विक्रेता संजय भंडारीच्या विदेशातील कथित अवैध संपत्तीशी संबंधित प्रकरणात एनआरआय उद्योगपती सी.सी. थंपी याला अटक केली आहे. त्याला अटक केल्यामुळे रॉबर्ट वाड्रा यांच्याविरोधातील प्रकरणाच्या तपासाला वेगळेच वळण मिळाले असून दुबई, लंडन आणि अन्य देशातील बेनामी संपत्ती प्रकरणात ईडीने वाड्रा यांची मागील दोन वर्षात १३ वेळा चौकशी केली आहे.
दुबईतील स्कायलाईट कंपनी ‘थंपी’च्या नियंत्रणाखाली असून भंडारीची कंपनी सॅनटॅक एफझेडईने २००९ मध्ये एका खासगी कंपनीकडून लंडनमध्ये मालमत्ता खरेदी केली होती, अशी माहिती सूत्रांनुसार मिळत आहे. ही मालमत्ता स्कायलाईटची असून वाड्रा यांनी लंडनमधील ही मालमत्ता खरेदी केली होती. मालमत्तेशी संबंधित वाड्रा आणि भंडारी यांच्यातील कथित मेल हे या प्रकरणातील पुरावे असल्याचा आरोप आहे.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे स्वीय सहायक पी. पी. माधवन यांनी त्याची भेट वाड्रा यांच्याशी करून दिली होती, असे थंपीने सांगितले असल्याचा तपास यंत्रणेचा दावा आहे. थंपी हाच कथितरित्या दुबईत वाड्रा यांचे प्रमुख संस्था चालवत आहे आणि त्यात स्कायलाईट हॉस्पिटॅलिटी एफझेडई आणि स्काईलाईट इन्व्हेस्टमेंट एफझेडई यांचा समावेश असून या कंपन्यांनी लंडनमध्ये मालमत्ता आणि दुबईमध्ये एक आलिशान बंगला खरेदी केला असल्याचाही आरोप आहे. या सर्व बेनामी मालमत्ता वाड्रा यांच्या असल्याचा संशय ईडीला आहे.