नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोशल मीडियावर उत्तेजित करणारा आणि अनैतिकतेला प्रोत्साहन देणारा व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी इजिप्तमधील प्रसिद्ध बेली डान्सर असणार्या सामा एल-मैसी हिला शिक्षा ठोठावण्यात आली आहे. रविवारी काहिरा शहरातील एका न्यायालयाने मैसी हिला दुर्व्यवहार करणे आणि लोकांना अनैतिक कामांसाठी प्रोत्साहन दिल्या प्रकरणी दोषी ठरवले आहे. या प्रकरणात मैसीला तीन वर्षांचा तुरुंगवास आणि 30 हजार पौंड (अंदाजे 14 लाख रुपये) अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.
मैसीच्या टिकटॉक अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. या व्हिडिओमुळे मैसीवर सार्वजनिक प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लोकांना उत्तेजित केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान 42 वर्षीय मैसी हिने तिच्यावरील सर्व आरोप फेटाळू लावत निर्दोष असल्याचे सांगितले. माझ्या फोनमधून कोणीतरी तो व्हिडिओ चोरला आणि माझ्या परवानगीशिवाय तो सोशल मीडियावर शेअर केल्याचा आरोप मैसी हिने केला आहे.
काहिरा येथील न्यायालयाने शनिवारी या प्रकरणासंदर्भात निर्णय देताना अनैतिकता पसरवण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करण्यात आल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. या प्रकरणातमध्ये मैसी हिने इजिप्तमधील कुटुंब पद्धतीचे नियम आणि मूल्यांचे उल्लंघन केले आहे असेही न्यायलयाने म्हटले आहे. या प्रकरणामध्ये मैसी वरिष्ठ न्यायालयात अर्ज करणार आहे.