मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – बॅंक घोटाळा प्रकरणात ईडीने(ED) मोठी कारवाई केली आहे. ED च्या अधिका-यांनी वेरॉन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज आणि इतरांवर कारवाई करत कोट्यावधींची संपत्ती जप्त केली आहे. ईडीने(ED) एकूण 20 अचल मालमत्ता जप्त केल्या असून त्यांची किंमत तब्बल 166 कोटी रुपये आहे. बनावट बिलांच्या आधारे लेटर ऑफ क्रेडिटमध्ये सवलत दिल्याचा कंपनीवर आरोप आहे.
बँक ऑफ इंडिया अन् कॅनरा बँकेतील अज्ञात अधिकारी तसेच वेरॉन कंपनीचे श्रीकांत सवाईकर यांच्या विरोधात सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची ईडीकडून चौकशी सुरु आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, राज्यातील पुणे, मुंबई आणि रत्नागिरी जिल्ह्यातील 20 निवासी फ्लॅट्स आणि भूखंड वेरॉन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे पीएमएलए अॅक्टनुसार जप्त केले आहेत. जप्त केलेल्या संपत्तीची किंमत 166 कोटी एवढी आहे. ईडीने म्हटले की, वेरॉन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे सवाईकरंद आणि त्यांच्या सहयोगींनी ग्रुप कंपन्यांमार्फत आणि अनेक शेल कंपन्यांमार्फत गैरव्यवहार केल्याचे तपासात पुढे आले आहे. तसेच गैरव्यवहार केलेला हा सर्व पैसा, निवासी फ्लॅट्स, जमीन खरेदीसाठी वेरॉन ग्रुप वापरत होता, असेही समोर आले आहे.