नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात थैमान घातलेली कोरोनाची दुसरी लाट आता ओसरताना दिसत आहे. मात्र आता म्युकरमायकोसिस म्हणजेच ब्लॅक फंगसचा धोका वाढत आहे. ब्लॅक फंगस कसा पसरतो, त्याच्यापासून बचाव करण्यासाठीचे उपाय काय यासंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे. कांद्यांवर दिसणारा काळा थर आणि फ्रिजमध्ये दिसणारा काळा थर ब्लॅक फंगस असल्याचा दावा पोस्टमध्ये केला आहे. मात्र वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी यात कोणतेही तथ्य नसल्याचे म्हटले आहे. कांद्यावरील किंवा फ्रिजमधील काळ्या थराचा ब्लॅक फंगसच्या आजाराशी काहीही संबंध नसल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. फ्रिजमध्ये जमा होणारा काळा थर, कांद्यावर दिसून येणारा काळा थर आणि ब्लॅक फंगस पूर्णपणे वेगळे आहेत.
एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, म्युकरमायकोसिस एक ब्लॅक फंगस नाही आणि ब्लॅक फंगसच नावच मुळात चुकीचे आहे. कारण ब्लॅक फंगस काळ्या रंगाची नसते. ब्लॅक फंगसची लागण झाल्यावर शरीरातील रक्तपुरवठा थांबतो. त्यामुळे त्वचेवर काळ्या रंगाचे डाग येतात. त्यामुळे याला ब्लॅक फंगस म्हटल जात असावे. याचे खरे नाव म्युकरमायकोसिस आहे. स्टेरॉईड्स हे म्युकरमायकोसिसचा धोका वाढण्यामागचे प्रमुख कारण असल्याचे डॉ. गुलेरियांनी सांगितले. एखादी व्यक्ती बऱ्याच कालावधीपासून स्टेरॉईड्स घेत असेल किंवा त्या व्यक्तीला मधुमेहासारखा आजार असल्यास तिला फंगल इंफेक्शनचा धोका असतो. त्यामुळे अशा व्यक्तींना अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. या आजाराला रोखण्यासाठी वेगाने काम करण्याची गरज असल्याचे डॉक्टर म्हणाले.