शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या हे विनाशाचं लक्षण : डॉ. आ. ह. साळुंखे
धुळे : बहुजननामा ऑनलाइन – शेतकरी जमिन विकतो किंवा देतो, त्यावेळी तो आपल्या काळजाचा तुकडाच देत असतो. त्याच्या शेकडो पिढ्यांचे त्या शेतीच्या मातीशी नाते असते. त्यामुळे शेतकऱ्याची जमिन घेणे म्हणजे त्याच्या काळजाचा लचका तोडल्यासारखे असते. जमिन विकूनही मोबदला मिळण्यासाठी हेलपाटे मारायला लावणे, म्हणजे शेतकऱ्याची लुबाडणूकच म्हटली पाहीजे. धर्माजी पाटील यांच्यासारखे शेतकरी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवितात, ही बाबच अतिशय वेदनादायी आहे. ते सामाजिक विनाशाचं लक्षण आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी येथे केले. डॉ.आ.ह.साळुंखे यांचा अमृत महोत्सवी नागरी सत्कार सोहळा हिरे भवनात झाला.२४ संघटनांनी हा सोहळा आयोजित केला होता. सत्काराला उत्तर देतांना ‘भारताची दशा आणि दिशा’ या विषयावर डॉ.साळुंखे बोलत होते.
अध्यक्षस्थानी माजीमंत्री रोहिदास पाटील होते. उद्घाटन मराठा सेवा संघाचे अध्यक्ष कामाजी पवार यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून छात्र भारतीचे माजी अध्यक्ष प्रा.अर्जून जाधव, डॉ.के.ए.सैंदाणे, ॲड.डॉ.साजेदा शेख, ज्येष्ठ पत्रकार रमेश दाणे, माजी आ.राजवर्धन कदमबांडे उपस्थित होते. सुरुवातीला शेतकरी स्व.धर्मा पाटील यांच्या पत्नी सखुबाई पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी आ. ह. साळुंखे म्हणाले, मी देशाचा चार हजार वर्षाचा इतिहास वाचून पाहीला, त्यात शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचं मला आढळले नाही. मात्र सन २००० या वर्षात जवळपास शंभरच्या आसपास शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या होत्या. त्यानंतर गेल्या १८ वर्षात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण लाखांच्या घरात पोहचले आहे. यातून आपण किती उद्ध्वस्त झालो आहोत, याची कल्पना येते. ज्या शेती व्यवसायावर देशातील ६० ते ७० टक्के लोक अवलंबून आहेत. त्या व्यवसायाची उपेक्षा आपली व्यवस्था करत आहे, ही धक्कादायक बाब आहे. एखादा उद्योग सतत तोट्यात चालत असूनही तो पिढ्यानुपिढ्या चालू असल्याचे दिसत नाही किंवा एखाद्या उद्योजकाने आपल्या कारखान्यातील माल तयार करून रस्त्यावर फेकल्याचे कधी पहायला मिळत नाही. मात्र शेतकऱ्याला शेती तोट्यात असून त्यावरच जीवन जगावे लागत आहे.
कांदा, टमाटे रस्त्यावर फेकून द्यावे लागत आहे, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. म्हणून शेतकऱ्यांप्रती आपल्याला संवेदनशील राहावे लागेल. आत्महत्येचे वाढते प्रमाण हे २१ व्या शतकातील भयानक चित्र आहे. म्हणून व्यवस्थेवर दडपण आणण्यासाठी सर्वांना एकत्र यावे लागेल.
विविध जाती, धर्माचे लोक या देशात एकत्र नांदत असतांना धर्माच्या नावाने सोशल मिडीयाद्वारे तरुणांची डोकी भडकविण्याचा उद्योग चालला आहे. तरुणांनी स्वत:ची डोकी भडकवून घेण्यापूर्वी सोशल मीडियावरील संदेशांची चिकित्सा करण्याची गरज आहे.
Comments are closed.