वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आज मोठा दिलासा मिळाला आहे. कॅपिटॉल हिलमध्ये हिंसाचार आणि दंगल भडकविल्याच्या आरोपातून सिनेटने त्यांची मुक्तता करण्यात आली. सिनेटमध्ये १० मते कमी पडल्यामुळे ट्रम्प यांची दुसर्यांदा महाभियोगाच्या खटल्यातून मुक्तता झाली आहे. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी या निर्णयाचे स्वागत करुन आपल्या लीगल टीमलाही धन्यवाद दिले. अमेरिकेच्या कोणत्याही अध्यक्षावर ही परिस्थिती यापूर्वी ओढावली नव्हती, अशी आठवण त्यांनी यावेळी करुन दिली.
अमेरिकन सिनेटमध्ये ट्रम्प यांच्यावरील आरोप सिद्ध होण्यासाठी ठरावाच्या बाजूने ६७ मत पडण्याची आवश्यकता होती. ५७ सदस्यांनी ते दोषी असल्याच्या बाजूने मतदान केले. तर ४३ सदस्यांनी या प्रस्तावाला विरोध केला. त्यामुळे १० मतांमुळे त्यांच्यावरील महाभियोग टळला आहे. सिनेटच्या निर्णयाकडे ट्रम्प यांचा विजय म्हणून पाहिले जात आहे. आता ट्रम्प यांना इच्छा असेल तर ते २०२४ मध्ये होणार्या अमेरिकी अध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकणार आहेत.
या महाभियोग प्रकरणी ४ दिवस सुनावणी करण्यात आली आणि त्यानंतर पाचव्या दिवशी यावर मतदान घेण्यात आले. सुनावणी दरम्यान त्यांच्या वकिलांनी ट्रम्प यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले होते. रिपब्लिकन नेत्यांविरुद्ध देशद्रोहाचा भडका उडविण्याचे आरोप हे साफ खोटे आहेत आणि त्यांच्याविरुद्ध महाभियोगाची कारवाई ‘राजकीयदृष्ट्या’ प्रेरित असल्याचे म्हटले होते.