बहुजननामा ऑनलाइन टीम – गेल्या तीन दिवसांपासून राज्यात बलात्काराच्या आरोपावरून राजकारणात चर्चा सुरू आहे. मंत्री धनंजय मुंडे वर त्या महिलेच्या तिच्या बहिणीने केलेले बलात्काराचे आरोप आणि महिलेपासून असलेल्या दोन मुलांचा स्वीकार ह्या विषयावरून धनंजय मुंडे यांच्याबाबत राष्ट्रवादीने भूमिका स्पष्ट केली आहे. तरीही आज राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरु झाली असून यामध्ये धनंजय मुंडेंबाबत निर्णय की चर्चा होणार, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.
मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे प्रकरणावर जयंत पाटील यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केल्याचे सांगत अधिक बोलण्यास नकार दिला आहे. आता सुरु झालेल्या राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रफुल पटेल उपस्थित आहेत. तर धनंजय मुंडे हे आज पहाटे कोणताही सोबत, सुरक्षा न घेता स्वतः खासगी गाडीतून चित्रकुट बंगल्यावर दाखल झाले. आता ते काही दिवस तिथूनच काम पाहणार असल्याचे समजते. तर मुंडेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार आणि छगन भुजबळ यांचीही भेट घेतली आहे. आता पवार काय निर्णय घेतात, यावर मुंडेंचे राजकारण अवलंबून असल्याचे समजते.
जयंत पाटील धनंजय मुंडे प्रकरणाबाबत म्हणाले की, राजकीय आयुष्यामध्ये एका विशिष्ट टप्प्यावर पोहोचण्यासाठी बराच संघर्ष करावा लागतो. अशावेळी कोणी काही आरोप करत असेल तर त्याची आधी चौकशी होणे आवश्यक आहे. सत्यता न पडताळता निष्कर्षावर येणे योग्य नाही, असं मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं आहे. तसेच जयंत पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची शक्यताही फेटाळली आहे.