पुणे : बहुजननामा ऑनलाइन – शिरुर तालुक्यातील शिक्रापूर पोलीस ठाण्यात आखाड पार्टी करणाऱ्या 11 डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव ढमढेरे येथे ही पार्टी सुरु होती. लॉकडाऊन काळात पाच पेक्षा जास्त नागरिकांना एकत्र येण्यास बंदी असताना या डॉक्टरांनी नियमांच उल्लंघन करत एकत्र येऊन आखाड पार्टी केली. याशिवाय पोलिसांनी दोन हॉटेल मालकांवर देखील गुन्हे दाखल केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील भीमाशेत वस्तीजवळ एका हॉटेलमध्ये पाच पेक्षा अधिक डॉक्टरांनी एकत्र येत गर्दी जमवली. शासकीय नियमांचे उल्लंघन करत त्यांनी ओली पार्टी करत असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी, पोलीस शिपाई विकास मोरे यांच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकला असता सर्व डॉक्टर पळून जाऊ लागले. त्यानंतर पोलिसांनी पाहणी केली असता शिक्रापूर, सणसवाडी परिसरातील तब्बल 11 डॉक्टरांनी एकत्र येत पार्टी केल्याचे आढळून आले.
याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई विकास मोरे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. त्यानुसार शिक्रापूर पोलिसांनी शिक्रापूर सणसवाडी परिसरातील 11 डॉक्टर आणि 2 हॉटेल मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी करत आहेत.