मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – देशात कोरोनाने हाहाकार केला असून, अनेक कोरोना रुग्ण आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने लसीकरण वाढवण्याचा निर्णय घेतला. यावरून आता १ मे नंतर १८ वर्षांवरील सर्वाना लस देण्यात येणार असल्याची अशी घोषणा सरकारने केलीय. मात्र याआधी मासिक पाळीच्या दरम्यान महिलांनी कोरोना लस घेऊ नये. असा एक मेसेज समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहे. यावर आता सरकारकडून खुलासा करण्यात आला आहे.
प्रसारित होणाऱ्या मेसेजच्या दाव्यात किती तथ्य?
सरकारकडून सांगण्यात आले आहे की, महिलांनी मासिक पाळीच्या ५ दिवस आधी आणि ५ दिवस नंतर कोरोना प्रतिबंधक लस घेऊ नये असा दावा करणारा अथवा प्रसारित झालेला मेसेज खोटा आहे. अफवांना बळी पडू नका. असे सांगण्यात आले आहे. तसेच, मुंबई महापालिकेच्या वतीने सुद्धा ट्विट करुन सांगण्यात आले आहे की, महिलांनी मासिक पाळीच्या कालावधीत लस घेऊ नये अशा आशयाचा संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यातील माहिती खोटी असून मासिक पाळी सुरू असताना लस घेतल्यास आपल्या शरीरावर कुठलाही परिणाम होत नाही. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका आणि त्या पसरवू नका.
काय आहे व्हायरल मेसेज?
समाज माध्यमांवर प्रसारित होणाऱ्या मेसेजमध्ये म्हटलं आहे की, महिलांनी मासिक पाळीच्या ५ दिवस आधी आणि ५ दिवस नंतर कोरोना प्रतिबंधक लस घेऊ नये. व्हायरल होणाऱ्या या मेसेजमुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळेच आता सरकारकडून याबाबत अधिक माहिती आणि स्पष्टीकरण दिल आहे.