नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसर्या लाटेचा संसर्ग अतिशय वेगाने पसरत असून दररोज नवीन रुग्णाची संख्या उच्चांक गाठत आहे. जगात नवीन आढळून येणार्या एकूण कोरोना रुग्णांपैकी तब्बल ३३ टक्के रुग्ण एकट्या भारतात आढळून येत आहे. गेल्या २४ तासात देशात २ लाख ६१ हजार ५०० नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहे. त्याचवेळी गेल्या २४ तासात तब्बल १ हजार ५०१ कोरोना बाधितांचा मृत्यु झाला आहे.
महाराष्ट्रासह देशातील १० राज्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट अत्यंत वेगाने पसरत आहे.गेल्या २४ तासात जगभरात ७ लाख ८३ हजार ६६७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी भारतात तब्बल २ लाख ६१ हजार ५०० नवीन रुग्ण आढळून आले आहे. हे प्रमाण जगातील ३३ टक्के नवीन रुग्ण भारतात आढळत आहेत. अन्य देशात कोरोनाचे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी होत असताना भारतात मात्र दिवसेंदिवस नवीन बाधितांची संख्या वेगाने वाढत आहे.
अमेरिकेत गेल्या २४ तासात ६३ हजार ५८१ नवीन कोरोना बाधित आढळून आले असून तेथे सध्या ६८ लाख ८६ हजार ३१ सक्रीय रुग्ण आहेत. अमेरिकेत एका दिवसात सर्वाधिक ३ लाख ९ हजार ४५ नवीन कोरोना बाधित ८ जानेवारी २१ रोजी आढळून आले होते. त्यानंतर नवीन बाधितांची संख्या कमी होत गेली आहे.
ब्राझीलमध्ये गेल्या २४ तासात ६५ हजार ७९२ नवीन कोरोना बाधित आढळून आले आहेत. तेथे सध्या ११ लाख ३३ हजार ३८१ सक्रीय रुग्ण आहेत. ब्राझीलमध्ये २५ मार्च रोजी सर्वाधिक ९७ हजार ५८६ नवीन रुग्ण आढळून आले होते.
अमेरिकेच्या खालोखाल भारतात सध्या १८ लाख १ हजार ३१६ सक्रीय रुग्ण आहेत. त्याचबरोबर अमेरिकेपाठोपाठ गंभीर रुग्णांची संख्या भारतात अधिक आहे.
भारतातील मृत्युचे प्रमाण अन्य देशांच्या तुलनेत अजूनही कमी आहे. दररोज होणार्या मृत्युपैकी ११ टक्के कोरोना रुग्णांचे मृत्यु एकट्या भारतात होत आहे.
ज्या वेगाने देशात कोरोनाची दुसरी लाट पसरताना दिसत आहे, हे पाहता देशात कोरोनाचा विस्फोट झाल्याचे दिसून येत आहे.