बहुजननामा ऑनलाइन टीम – आतापर्यंत जगभरात ७ कोटी २६ लाख ४६ हजार ६१८ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील १६ लाख १८ हजार ९०८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जगात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण अमेरिकेत सापडले असून, मृत्यूचे प्रमाणही जास्त आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर भारत व तिसऱ्या स्थानी ब्राझील आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या जगातील अनेक देशांनी पुनश्च टाळेबंदी लागू केली आहे. त्यातच आता मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स(Bill Gates) यांनी कोरोनाबाबत एक इशारा दिला आहे.
बिल गेट्स म्हणाले, कोरोना संसर्गाच्या दरम्यान पुढील चार ते सहा महिने खूपच वाईट असू शकतात. जगभरात आणखी दोन लाख मृत्यू होण्याची शक्यता इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड रिव्होल्यूशने वर्तवली आहे. जर हे मृत्यू रोखायचे असतील तर त्यासाठी सातत्याने मास्क वापरणे, व सामाजिक अंतराचे पालन करणे गरजेचे आहे.
अमेरिकेत कोरोनाच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर गेट्स यांनी म्हटलं की, मागील काही आठवड्यांमध्ये अमेरिकेत कोरोनाच्या रुग्णांमध्ये विक्रमी वाढ नोंदवण्यात आली आहे. त्याचसोबत मृत्यू आणि रुग्णालयात दाखल होणाऱ्यांचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. मला वाटत की, अमेरिका या परिस्थितीचा सामना चांगल्या पद्धतीने करेल.
तत्पूर्वी, गेट्स यांनी २०१५ सालीचा अशा प्रकारच्या संकटाचा इशारा दिला होता. ज्यावेळी २०१५ मध्ये अशा संकटाच्यासंदर्भात बोललो होते. तेव्हा मृत्यूची संख्या अधिक असण्याची शक्यता व्यक्त केली होती. सध्या हा संसर्ग जेवढा घातक आहे. त्यापेक्षाही तो धोकादायक असू शकतो. अजूनही कठीण काळ पाहिलेला नाही. सर्वात धक्कादायक गोष्ट अशी की अमेरिका आणि जगभरातील अर्थव्यवस्थेवर या महामारीचा झालेला परिणाम. कारण पाच वर्षांपूर्वी व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजापेक्षा कितीतरी पटीने तो अधिक आहे, असं बिल गेट्स म्हणाले.