नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात वेगाने वाढणार्या कोरोना विषाणू संसर्गादरम्यान अनेक भयानक प्रकरणेही समोर येत आहेत. कोरोना विषाणूवर केलेल्या नव्या संशोधनातून असे दिसून आले आहे की, कोरोना विषाणूने मानवी शरीरात प्रवेश केल्यानंतर वेगवेगळ्या अवयवांवर परिणाम होतो. जेव्हा संसर्ग तीव्र होतो तेव्हा फुफ्फुस, मूत्रपिंड आणि इतर अनेक अवयवांचे तीव्र नुकसान होते. अशा परिस्थितीत कोरोना विषाणूचा अहवाल नकारात्मक आल्यावरसुद्धा एकदा कोरोनाचा संसर्ग झालेला माणूस इतर आजारांशी झुंज देत राहतो.
द लान्सेट मायक्रोबमध्ये प्रकाशित केलेल्या संशोधन अभ्यासानुसार, कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची फुफ्फुसे किंवा किडनीचे गंभीर नुकसान झाले होते. इंग्लंडमधील कोरोना रूग्णांच्या पोस्टमार्टम रिपोर्टवर इम्पीरियल कॉलेज लंडन आणि इम्पीरियल कॉलेज हेल्थकेअर एनएचएस ट्रस्टने संशोधन केले आहे. संशोधनात असे आढळले आहे की, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये १० मधील ९ रुग्णांना हृदय, मूत्रपिंड आणि फुफ्फुसात थ्रोम्बोसिस म्हणजे रक्ताचे गठ्ठे आढळले. या संशोधनावर काम करणारे डॉ. मायकेल ऑस्बर्न म्हणाले की, कोरोना रूग्णांसाठी हे धक्कादायक आहे. कोरोना विषाणूमुळे फुफ्फुसांचा संपूर्ण नाश होतो, ज्यामुळे रुग्णाचा मृत्यू होतो.
तसेच इम्पीरियल कॉलेज एनएचएस ट्रस्टच्या रूग्णालयात २२ ते ९७ वयोगटातील कोरोना रूग्णांच्या पोस्टमार्टम अहवालाची तपासणी केली गेली. या संशोधनातही असे आढळले की, कोरोना रूग्णाच्या किडनीमध्ये कोरोनामुळे गंभीर दुखापत झाली होती आणि आतडे सुजलेले होते. संशोधनात असे दिसून आले की, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूमागील मुख्य कारण म्हणजे उच्च रक्तदाब आणि क्रोनिक ऑब्स्ट्रॅक्टिव्ह पल्मोनरी डिसीज म्हणजे फुफ्फुसात होणारा त्रास होता. जेव्हा या रूग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेव्हा त्यांना ताप होता आणि श्वास घेण्यास त्रास होत होता.