हाथरस (Hathras) येथे गेल्या काही दिवसांपूर्वी पत्रकार आणि सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाल्यचे स्पष्ट झाले होते. यानंतर आता हाथरस (Hathras) गावातील सर्व लोकांची मंगळवारी कोरोना चाचणी करण्यात आली आहे.
युपी सरकारनं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून हाथरसमध्ये सतत राजकीय पक्षांचे नेते आणि पत्रकारांची ये जा सुरू होती. हे पाहता गावातील लोकांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. याचा विचार करून ग्रामस्थांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार, पीडित कुटुंबातील सर्व सदस्यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली. पीडितेच्या गावातील लोकांच्या कोरोना चाचणीचे रिपोर्ट 24 तासात येण्याची शक्यता आहे.
200 अज्ञातांविरोधात FIR
काही दिवसांपूर्वीच काँग्रेस नेते राहुल गांधी, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी, भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद आणि इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांनी हाथरस गावाचा दौरा केलेला आहे. तसंच पत्रकारांची गर्दी देखील पहायला मिळाली आहे. भाजपचे माजी आमदार राजवीर सिंह पहलवान यांच्या विरोधात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्यावर कलम 144 चं उल्लंघन करणं आणि साथीच्या आजाराच्या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हाथरस पोलिसांनी 200 अज्ञात लोकांविरोधात एफआयआर दाखल केली आहे.