मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज (12 डिसेंबर) 80 वा वाढदिवस साजरा होत आहे. देशभरातून शरद पवार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही फोनवरुन शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनीही शरद पवाराना वाढदिवसांच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या कामाचं कौतुक केलंय.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यभरात विविध उपक्रमांनी शरद पवार यांच्या कार्याची महती सांगितली जात आहे. तसेच, विविध उपक्रमाद्वारे राज्यात विधायक कामे केली जात आहेत. राजकारणात मतभेद अनेकदा असतात. पण, मनभेद कधीच नसतात. भिन्न विचारांच्या पण सर्वांनाचा मार्गदर्शक असलेल्या शरद पवार यांचा आज 80 वा वाढदिवस आहे.
कोरोना काळात देखील वयाची पर्वा न करता, आपल्या सहयोगी पक्षातील काही नेत्यांना लाजवतील, असे दौरे आपण केले, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चिमटा काढलाय.
शरद पवार यांना राजकारणाचा सुमारे 50 वर्षांचा अनुभव असून राज्याच्या हितासाठी त्यांनी अनेक निर्णय घेतले आहेत. स्थानिक स्वराज संस्थेत महिलांना 50 टक्के आरक्षण देऊन शासन प्रक्रियेत सामावून घेण्याचा ऐतिहासिक निर्णय शरद पवार यांनी घेतला, असे सांगत चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांचे कौतुक केलंय.
केंद्रीय कृषीमंत्री असताना शेती व दुग्ध उत्पादन क्षेत्रात त्यांनी उत्तम काम केले. शेतकर्यांना सर्व बंधनातून मुक्त करणार्या सर्व गोष्टींना व विधेयकांना त्यांचा पाठिंबा राहिला असून पुढेही ते मिळेल,’ असे सूचक आवाहनही चंद्रकांत पाटील यांनी केलंय. सध्याच्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अनुसरून असं आवाहन पाटील यांनी केलंय.
राजकारणात आपले विचार आणि आदर्श वेगळे राहतील. मात्र, राज्याच्या जनतेच्या हितासाठी आपण सरकारला आणि सरकारच्या बाहेरदेखील मार्गदर्शन करात राहाल, अशी अंबाबाई चरणी प्रार्थना करतो, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांना शुभेच्छा दिल्यात.